*|| सुमंगल सुप्रभात ||*
*|| वंदे मातरम् ||*
🌞 *दिन विशेष*
इसवी सन २०२० : २५ ॲाक्टोबर
शालिवाहन शक १९४२,(विक्रम संवत २०७७)
संवत्सर नाम : शार्वरी
अयन : दक्षिणायन
ऋतु : शरद
मास(महिना) : निज अश्विन
पक्ष: शुक्लपक्ष
तिथी : नवमी – दशमी
वार : रविवार
चंद्रनक्षत्र : धनिष्ठा
चंद्रराशी : मकर – कुंभ
सूर्यराशी : तूळ
राहूकाळ : १६:३९ ते १८:०५
सुर्योदय : ०६:३९
सूर्यास्त : १८:०५
*विजया दशमी – दसरा*
१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.
१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली.
१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
२००१ – मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
२००७ – एरबस ए-३८०चे प्रथम प्रवासी उड्डाण.
*।। दास-वाणी ।।*
विनोदार्थी भरें मन ।
श्रृंघारिक करी गायेन ।
राग रंग तान मान ।
तो रजोगुण ।।
आळस उठे प्रबळ ।
कर्मणुकेचा नाना खेळ ।
कां उपभोगाचे गोंधळ ।
तो रजोगुण ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०२/०५/२४-२६
विनोद चुटके पांचटपणा मनापासून आवडतो.
लावणी प्रेमगीते अशी शृंगारिक गाणीच गायला आणि ऐकायला आवडतात.
रागरागिण्या आलापी हावभाव यामधे मन रमते.
एकंदरीत दिलदार रसिकता ही रजोगुणी वृत्ती आहे.
प्रपंचामधे उत्तम मानली जाते, तर परमार्थाला घातक.
रजोगुणी माणसाला आळस फार. ऐसपैस छंदिष्ट राहाणीमान असते. खाणे, पिणे, करमणुकीचे
विविध प्रकार मनापासून आवडतात तो रजोगुणी.
स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी उपभोगाची सर्व साधने कमावण्यात प्रचंड उत्साह,
वेळ आणि पैसेही खर्च करण्यात ज्याला धन्यता वाटते आणि तीच इतिकर्तव्यताही मानतो तो रजोगुणी.
देव मुख्यत: सत्वगुणी, माणूस सहसा रजोगुणी तर दानव बहुधा तमोगुणी मानले जातात.
*रजोगुणलक्षणनाम समास.*
*श्रीराम जय राम जय जय राम*
*शुभ दसरा व विजया दशमी*
*आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!*
*विजयादशमी :*
विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा असेही म्हटले जाते. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.
*महत्व:*
विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे . लोक या दिवशी परस्परांनासोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.
प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य संपन्न केली जातात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी,सोन्याची खरेदी केली जाते.
*पौराणिक आख्यायिका:*
श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे.
या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशीही आख्यायिका आढळून येते.पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते.त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते.
विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात. ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत.
*भारतातील विविध प्रांतांतील दसरा :*
*उत्तर भारत -*
उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.
*गुजरात -*
सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.
छत्तीसगड –
छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.
*महाराष्ट्र -*
महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात.
घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.
*पंजाब-*
पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. लोक परस्परांना मिठाई भेट देतात.
*दक्षिण भारत-*
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.
आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याजोडीने दस-याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हटले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही संपन्न होते.