ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय… म्हणजे जीभ ! [What is senses and actions?…]

👅ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय👅


ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय... म्हणजे जीभ ! [senses and actions...]
Photo by Cleyton Ewerton from Pexels


 खरोखरच वाचण्यासारखे…..


ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण

असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ. 🤡


एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.😀


सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ. 🤗


कलंदर अवयव म्हणजे जीभ

प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ, भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ ! 🤣


चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ


ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय... म्हणजे जीभ ! [senses and actions...]
Photo by Ivan Babydov from Pexels


सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ ! 😳


बिलंदर अवयव जीभ


बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “कामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव जीभ ! 👅


दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळुशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !🤔


अवलिया अवयव म्हणजे जीभ


पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणुकाही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ !🤒


हुश्शार अवयव म्हणजे जीभ


ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !😛


ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय... म्हणजे जीभ ! [senses and actions...]
Photo by Andrea Piacquadio from Pexels


योगी अवयव म्हणजे जीभ

ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ ! 😝


आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यानी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकवणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! 😜


उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना….
त्याची जिरोनी गेली वासना.

Leave a comment