कृष्ण – एक चक्रव्यूह आणि आनंदाचा देव … ( Krishna – the God of Chakravyuh and happiness …)

🔆 कृष्ण – एक चक्रव्यूह 🔆

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

कृष्ण - एक चक्रव्यूह आणि आनंदाचा देव ...कृष्ण अंधारात जन्माला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. 

एक वडील मुलाला म्हणाले…, 

” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ. “

मुलगा भिंतीवर चढला.

वडील म्हणाले…, 

” आता खाली उडी मार. मी आज तुला मोठा धडा शिकवत आहे.”

मुलगा घाबरला. दहा फूट खाली उडी मारायची हिंमत होत नव्हती.

वडील म्हणाले, 

” मार उडी. काळजी करू नकोस, मी तुला झेलून घेईन.”


मुलाने डोळे बंद केले आणि उडी मारली. बाप बाजूला निघून गेला. मुलगा धाडकन खाली आदळला. जोरात आपटला. 

वडिलांनी मुलाला सांगितलं, 

माझ्यावर विश्वास ठेवून उडी मारायची चूक केलीस. म्हणून पडलास. डोळे उघडे ठेवून, तुझ्या बळावर उडी मारली असती तर काही झालं नसतं. आज मी तुला मोठा धडा शिकवला. जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर कर…, शांत डोक्याने आणि डोळे उघडे ठेवून कर…


हेही वाचा – प्रेमाची ताकद ( power of “LOVE” )

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🔆

चक्रव्यूह

🔆

कृष्णही असाच खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही…! 

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळेच… 

चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही. कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही.


चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ”चालू” आहे असंच म्हणा हवं तर… चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो. 

फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे…

🔆

कृष्ण – एक चक्रव्यूह आणि आनंदाचा देव

🔆

तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा…

अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.


कृष्ण - एक चक्रव्यूह आणि आनंदाचा देव ...


श्रीकृष्ण “न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार” अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन…


 ॥ विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था

॥ कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था

॥ भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था


कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज…

अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसर्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो…


॥ यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: 

॥ तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥


जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार…? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल…


कृष्ण - एक चक्रव्यूह आणि आनंदाचा देव ...🚩 धर्माची स्थापना 🚩

॥ रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो…

॥ कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो…


तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती – अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो, की आपण कोणत्या रंगात रंगतो.

हा कृष्ण काल होता, आज आहे आणि उद्याही असणारच…


॥ धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥


तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन… 

म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.

कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.


श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.


श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली. गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.


आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, त्याने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही…


कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही….

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Leave a comment