आला श्रावण श्रावण- [ SHRAWAN ]

🥀श्रावण🥀

आला श्रावण श्रावण- [ SHRAWAN ]

आला श्रावण श्रावण

तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर .. ‘दिव्याची आवस’म्हणून जाड कणिक केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप… म्हणजेच आला श्रावण श्रावण !!
 
डबा भर चिरलेला पिवळा धम्मक गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पुड, उपासाची भाजणी राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर !!
 
जिवतीचा फोटो, कहाण्यांच पुस्तक, स्वच्छ घासून  चमकणारं पळीपंचपात्र , दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा आघाडा फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन !!
 
श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वडया, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हारोळ्याचे लाडू, भोपळयाचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.. श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध !!
 
श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनीकडे झालेलं सौवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर.. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण !!
 
श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार.. श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं धुप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण जाई जुई तगर जास्वंद बेल दुर्वा पत्री तुळस यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं आंगण !!
 
श्रावण म्हणजे हिरवा ऋतु .. या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.. कांकणांची किणकीण, काचेचा चुडा, हातावरची मेंदी, जरी काठाच्या साड्या, केसांत जुईचा गजरा, पायी जोडव्यांचा आवाज, गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानांत कुड्या आणि पायांत पैंजण.. म्हणजेच घरातही भेटणारा, सजवणारा श्रावण !!
 
श्रावण म्हणजे आठवणींची सर.. श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल… श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण.. श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि तिने आग्रहानं खावू घातलेली पुरणाची मऊसूत पोळी.. श्रावण म्हणजे देव्हाऱ्यांत समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप.. श्रावण म्हणजे आई तुझ्या आठवणींचा पाऊस !!!

0 thoughts on “आला श्रावण श्रावण- [ SHRAWAN ]”

Leave a comment