वणवा
मागील एक ते दीड महिना , जेव्हा जेव्हा मी सह्याद्रीमध्ये प्रवास केला आहे तेव्हा तेव्हा मला किमान एक तरी वणवा पेटलेला दिसला आहे. हे वणवे आपोआप लागत नाहीत तर कुणीतरी जाणिवपुर्वक लावतात तर अगदी क्वचितच वणवे चुकून लागतात. दोन्ही स्थिती मध्ये निसर्गाचे अतोनात नुकसान होते. माणसाच्या निर्बुध्दपणामुळे लागणा-या या वणव्यांमुळे निसर्गाचे सर्वाधिक नुकसान होत आहे.
मुद्दाम वणवा लावणा-यांमध्ये मुख्यतः दोन प्रकारचे लोकं आहेत. एक म्हणजे गवत जळाले की पुढील हंगामात अधिक चांगले गवत उगवते असा गैरसमज असणारे भाबडे लोकं की जे गाई गुरांना अधिक चांगला चारा मिळेल या खोट्या आशेने निसर्गातील लाखो करोडो जीवजंतुंना जिवंत जाळण्याचे महापाप न कळत करतात. तर दुसरे जे वणवा लावणारे लोकं आहेत ते मात्र जणिवपुर्वक रान पेटवुन देतात. त्यांना शिकार करायचे असते किंवा रान साफ करायचे असते.
सुक्ष्म जीवजंतु जे मातीला पोषण देतात ते देखील मरतात तर सरपटणारे प्राणी, जमीनीवर घरटे तयार करणारे पक्षी, त्यांची पिले, अंडी, हेच काय तर वणव्याच्या झळांनी करोंडोंच्या संख्येने मधमाश्यांची मोहोळं नष्ट होतात, फुलपाखरं, सुरवंट, माश्या, काजव्यांची अंडी, झाडांवरील पक्ष्यांच्या घरट्यांमधील पक्ष्यांची पिले, साप, सरडे, पाली, अस सगळं जळुन खाक होऊन जातं. आगीच्या डोंबात जिवंत जळण्याची वेळ या सर्वांवर कुणामुळे येते तर ती येते मनुष्यामुळे. किती मोठे पाप आहे ना हे?
जमीनीची धुप होऊन, मातीतील पोषण मुल्य नष्ट होतात. उघडी पडलेली माती पुढील पावसात सहज पाण्यासोबत वाहुन जाते, ही सगळी माती शेवटी नदीवर बांधलेल्या एखाद्या धरणात जमा होते. अशापध्दतीने गेली अनेक दशके आपली धरणे ३० टक्क्यापेक्षा जास्त मातीचे भरुन गेली आहेत. याचाच अर्थ धरणांमधील पाणी साठा कमी कमी होणार आहे भविष्यात आणि माणसाच्या पुढील पिढ्यांना भयकंर अश्या हाणामा-या कराव्या लागतील पाण्यासाठी.
वणवा एवढचं करुन थांबत नाही मित्रहो. पावसाळ्यात ज्या ज्या म्हणुन बिया अंकुरल्या असतात, त्यांची एव्हाना चांगली गुडघ्या इतकी उंच रोपे बनलेली असतात. आता या दिवसांत त्यांना नवी पालवी, नव्या फांद्या आलेल्या असतात, येणार असतात. हा उन्हाळ्याचा काळ म्हणजे या नव्या रोपांसाठी वाढीचा, विकासाचा काळ. पण दुर्दैव पहा या रोपांचे की वणवा त्यांना देखील उभा जाळुन टाकतो. हे असं गेली किमान चाळीस वर्षे सुरु आहे. कशी वाढणार बरं मग झाडं, कशी बनणार नवी जंगलं, कस होणार तापमान कमी, कस होईल गोल्बल वार्मिंग कमी, कशी होईल आपली वसुंधरा पुन्हा हिरवीगार?
नाहीच होणार! जोपर्यंत वणवे पेटवणं , लावणं, लागणं थांबत नाही तोपर्यंत हे आपण केवळ भयावह ,बकाल, उघडाबोडक असं आपलं आणि निसर्गातील प्रत्येक प्राणीमात्राच भविष्य घडवत आहोत.
हा धोका भयंकर आहे. एकवेळ पावसाळ्यात एकदेखील झाड नाही लावले तरी चालेल. झाडझुडपं, वृक्ष वेलींना ठावुक आहे कस वाढायच, कस बीजांकुरण करायचं, कशा पध्दतीने नवीन रोपे तयार करायची, आणि ती कशी जगवायची. एकेका वनस्पतीला हजार ते अक्षरशः लक्षावधी बीज येऊ शकतात. वणवे नाही लावले गेले तर विचार करा आपली वसुंधरा किती लौकर, कमी कालावधीतच हिरवा शालु नेसेल!
हेमंत ववले, निसर्गशाळा
No copyright 😊
जास्तीतजास्त शेयर करा, कॉपी पेस्ट करा, फेसबुक, whatsapp, सगळे ग्रुप्स, नातेवाईक, मित्र परिवार सर्वांपर्यन्त पोहोचवा 🙏