संत ज्ञानेश्वर
मूळ नाव : ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी
जन्म : इ.स. १२७५, आपेगाव, महाराष्ट्र
निर्वाण : इ.स. १२९६, आळंदी; महाराष्ट्र
समाधिमंदिर : आळंदी
उपास्यदैवत : विठ्ठल
संप्रदाय : नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय
गुरू : निवृत्तीनाथ
शिष्य : विसोबा खेचर
भाषा : मराठी भाषा
साहित्यरचना : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका),अमृतानुभव, हरिपाठ, अभंग
संबंधित तीर्थक्षेत्रे : आळंदी, नेवासे
वडील : विठ्ठलपंत
आई : रुक्मिणी
विशेष माहिती :
ज्ञानेश्वरांची भावंडे – निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई
संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली.
संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म – वारकरी संप्रदायाचा प्रसार केला.
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले.
निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात.
हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.
कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब’ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.
‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते.
पण यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्र्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय.यात अद्वैताचे अप्रतिम दर्शन आहे.
संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो.
या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात.
अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात.
त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला.
भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.