🖋 बहिणाबाई चौधरी 🖋
बहिणाबाई चौधरींच्या काही आठवणी त्यांचा मुलगा सोपानदेव यानं लिहून ठेवल्यात. त्यातलीच ही एक.
👉बुवा स्वतःचं काय सांगतच नाही👈
एकदा गावात किर्तनाचे कार्यक्रम चालू होते. अख्खा गाव ते ऐकायला गोळा होत होता. बहिणाबाईसुद्धा जायच्या. पण तीन-चार दिवस झाल्यावर त्या जायच्या बंद झाल्या. हे सोपानदेवच्या लक्षात आलं. त्यानं तसं बहिणाबाईना विचारलं. “काय गं. तूं जात नही का आजकाल किर्तनाले.”
त्यावर बहिणाबाई म्हणाल्या. दोन तीन दिस गेलते की. पण ते किर्तन करणारं बुवा स्वतःचं काय सांगतच नही.
तुकाराम हे म्हणला. नामदेव ते म्हणला.
आरं तुला डोळं दिलं नही का देवानं? तुला जग दिसत नही? तुला मेंदू नाही इचार करायले ? तुला काय सुचत नही का तुझ्या बुद्धीप्रमाणं ?
*कवातरी स्वतःचं कायतरी सांगत जा.*
आपलं काय रोज उठून तुका म्हणे, नामा म्हणे, सोमा-गोमा म्हणे.
त्या काळात कसं काय बहिणाबाई अशा विचारांची झाली असेल ?
🖊 बहिणाबाई 🖊
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभाळात!
—————————
अरे संसार संसार
जसा तवा चुह्यावर
आधी हाताला चटके
तेव्हा मिळते भाकर
हेही वाचा – शास्त्रज्ञ टेसी थोमस ” मिसाईल वुमन “
जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा लाभलेल्या, अहिराणी भाषेतुन अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्या बहिणाबाई चॊधरी !
विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा मराठी वाङ्मयाचा सुवर्णकाळ समजला जातो. खानदेशातील सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे अत्रे यांचे निकटचे स्नेही होते आणि बहिणाबाई या त्यांच्या मातोश्री.
एके दिवशी अचानक सोपानदेव आचार्यांकडे आले आणि पुढे काय झाले ते खुद्द अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता पहिल्यांदाच म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षानी, १९५२ मध्ये प्रकाशित झालेल्या संग्रहाच्या प्रस्तावनेत लिहून ठेवलं आहे. तो अनुभव अत्रे यांच्याच शब्दांत घ्यायला हवा…. :
-माजघरात सोन्याची खाण-
बहिणाबाई या सोपानदेवांच्या मातोश्री.
(१९५१) साली वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी वीस-बावीस वर्षांची मैत्री आहे. पण त्यांच्या माजघरात सोन्याची खाण दडलेली असेल, याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वत:ला याची जाणीव असेल पण ते पडले मुलखाचे लाजाळू. *त्यांना वाटले की खानदेशी वर्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे ‘सुशिक्षित आणि सुसंस्कृत’ महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणास ठाऊक!* म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून बसले.
मागल्या दिवाळीच्या आधी ते एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखविली :
💗 आईची एक कविता 💗
*येहरीत दोन मोटा*
*दोन्हीमधी पानी एक*
*मोट हाकलतो एक*
*जीव पोसतो कितीक?*
💛 बावनकशी सोने 💛
त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली आणि आणि आधाशासारख्या सार्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, ‘अहो, हे बावनकशी सोने आहे!
हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करावयाचे आम्ही ठरविले. अत्रे यांनी त्यानंतर तातडीने परचुरे प्रकाशन मंदिराचे ग.पां. परचुरे यांच्याशी संपर्क साधला आणि बहिणाबाईंच्या कविता त्यांच्या मृत्यूनंतर का होईना ‘छाप्यात’ आल्या. पुस्तकातून त्या घराघरांत गेल्या आणि अनेकांच्या ओठांवर जाऊन बसल्या. ग्रामीण भागातील अर्धशिक्षित अशा एका महिलेनं आपल्या स्वत:च्या शब्दांतून व्यक्त केलेल्या भावना इतक्या प्रभावी होत्या की एकदा त्या ओळी कानांवर पडल्यावर त्या आठवणीत कायमच्या रुतून बसायच्या! साध्या-सोप्या शब्दांत त्यात व्यक्त झालेलं जीवनविषयक तत्त्वज्ञान तर या ओव्यांना थेट संतकवींच्या पातळीवरच घेऊन जाणारं होतं. आज पन्नास-पाऊणशे वर्षांनंतरही…
‘ तूच तुझी वैरी ‘
👉बाईच बाईच्या जिवावर उठते👈
पण ‘ तूच तुझी वैरी ‘
स्त्री पुरुष समानता
विचार मले पटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
माणसानं म्हणतात
मागं ठेवल्या बाया
पण एका हातानं सांगा
वाजतात का टाया
बाईचं सुख पाहुन
बाईच आतून पेटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
बाईच्याच बोटावर
माणूस नाचत असतो
कसा काय बाईले तो
कमी लेखत असतो
जागो जागी आपल्याले
हेच दिसत असते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
एस. टी.त बाईले
माणूस जागा देईन
पण बाई मात्र बाईले
तशीच ऊभी ठेईन
आणखीनच ते आपलं
फतकल मांडून बसते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
पोराच्या लग्नात
हुंडा कोण मागते
पोराची माय सारं
घरूनच सांगते
सून घरी आली की
सासूलेच खूपते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
एक दिवस माह्या घरी
सायी माही आली
काय सांगू राज्या मले
लय खुषी झाली
बायकोले बापा माह्या
हे बी खटकते
खरं सांगतो बाईचं
बाईच्या जिवावर उठते
मले वाटलं सायीले
सिनेमाले नेवाव
बायकोची बहीण म्हणून
मागीन ते देवाव
बायकोले वाटे आता
माहा पत्त कटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
बायकोची बहीण असून
माह्या मनात आदर
तिची बहीण असून तिले
आहे काय कदर
माह्या बहीणीले हे
खलबत्यात कूटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
नणंदही भावजयवर
गाजवते ठेका
माहा मान मोठा म्हणे
असा तिचा हेका
हीले काही घेतलं की
ते तिकडे फुगते
खरं सागतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
पोरगा व्हावा म्हणून
बाया हट्ट करतात
देवी देवतांचे त्या
उपवास धरतात
पोरीची संख्या
अशानच घटते
खरं सागतो बाईचं
बाईच्या जिवावर उठते
मुलगा मुलगी होणं
नसते आपल्या हाती
मुलगा असतो दिवा
तर मुली असतात ज्योती
बुद्धीनं मुलगीही
यशोशिखर गाठते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
माणूस म्हणून स्त्री- पुरुष
सारखेच माना
प्रगतीच्या प्रवाहात
दोघायलेही आणा
भेदभावाची दरी मग
आपोआप मिटते
खरं सांगतो बाईच
बाईच्या जिवावर उठते
या आणि अशा अनेक काव्यपंक्ती मराठी माणसाच्या मनातून दूर होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळेच या अशा अजरामर ओळींची गाणी होणं जितकं स्वाभाविक होतं, तितकंच ती रेडिओवरनं पुढची पाच-सात दशकं वाजत राहणं, हेही अपेक्षितच होतं. बहिणाबाईंच्या प्रतिभेचे अनेक नमुने इथे सादर करता येतील. पण वानगीदाखल त्यातील एक सादर करण्याचा मोह आवरता येणं कठीण आहे. आपलं मन चंचल असतं, हे सर्वांनाच ठाऊक आहे.
बहिणाबाईंच्या कविता या खरं तर सर्वांनी मुळातूनच वाचायला हव्यात. त्याची गोडी ही अशा ‘सुशिक्षित आणि सुसंस्कृत’ शब्दांतून व्यक्त करता येणं कठीणच आहे.