श्रीगीता… सर्व मानवांना सर्वकाळ मार्गदर्शन करणारा एक दिव्य ग्रंथ…
लो. टिळक म्हणतात आमच्या धर्मग्रंथातील तेजस्वी आणि निर्मल हिरा आहे भगवद्गीता…!
ग्रंथी म्हणजे गाठ… अज्ञान, विकार, वासना, भेद या गाठी ग्रंथी… त्यातून सोडविणारे ते ग्रंथ…
हृदय ग्रंथी भेदन करणारा श्रेष्ठ ग्रंथ…श्रीगीता…!
गीता हे एक आदर्श सर्वोच्च सदगुरु आणि शिष्योत्तमा मध्ये निर्माण झालेले एक उपनिषदच आहे. किंकर्तव्य मूढ झालेल्या अर्जुनाला कर्तव्याचा उपदेश करत असताना ज्ञान भक्ती आणि योगसाधना सांगून मानवी जीवन सर्वार्थाने कृतार्थ करणारे आणि प्रत्येक जीवाला परमात्म प्राप्ती करवून देणारे दिव्य तत्वज्ञान म्हणजे गीता….
अर्जुनाला कर्तव्याचा उपदेश करताना सर्वप्रथम त्याच्या अहंकारावरच प्रहार भगवंतांनी केला… हृदयग्रंथीचे भेदन यामुळेच तर होईल. एकेका दोषावर प्रहार करीत भगवंतांनी अर्जुनाच्या जीवदशेचा निरास केला. गुंतलो होतो अर्जुनगुणे । मुक्त झालो तुझियेपणे ।। हा अनुभव अर्जुन यामुळेच तर घेऊ शकला.
गीता रुपी ज्ञान अर्जुनाला मिळून तो कृतार्थ झाला. एक आदर्श शिष्य अर्जुनाच्या रूपाने आपल्या समोर उभा राहिला. जीवनाची कृतार्थता साधायची असेल तर अर्जुनाची गुणवत्ता धारण करायला हवी.
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “।। जे न संगेचि पितया वसुदेवासी । जे न संगेचि माते देवकिसी । ते गुह्य अर्जुनसी बोलत ।।” हे सर्वोत्तम दिव्य कृतार्थ करणारे ज्ञान भगवंतांनी फक्त अर्जुनालाच दिले. भक्तराज आणि भगवंताचा सखा असा गीतारुपी उपदेश ऐकण्याच्या आधीचा अर्जुन सर्व सामान्य जीवांचा प्रतिनिधी आहे असे सांगितले जाते. पण खरेच असे आहे का…. युद्धभूमीवर आपल्या स्वजनांना पाहून आपल्या हातून पाप तर घडणार नाही ना या विचाराने अर्जुन गोंधळला. आपला गोंधळ वेगळ्याच कारणासाठी असतो. कुठे स्वार्थ आडवा येतो, कुठे अहंकाराला धक्का बसत असतो. माझ्या हातून पाप घडत नाही ना हा विचार फारच क्वचित आपल्या मनाला स्पर्श करीत असेल.
वर म्हणल्याप्रमाणे अर्जुन आपला प्रतिनिधी होऊ शकत नाही.
हे ज्ञान मिळवायचे असेल तर अर्जुनाच्या पंक्तीला बसायला हवे असे श्रीमाऊली म्हणतात… पण अर्जुनाच्या पंक्तीला बसणे अजिबात सोपे नाही… अर्जुना तू सुमनु आणि शुद्धमती… चांगल्या मनाचा आणि चांगल्या बुद्धीचा असा अर्जुन होता. जे ऐकले ते तत्क्षणी आचरणात आणत असे. भगवंताच्या शब्दावर त्याचा प्रगाढ विश्वास होता… अतिशय कठीण असा युद्धाचा, आपल्या आप्त स्वकीयांना मारण्याचा निर्णय त्याला खूप कमी वेळात घ्यायचा होता. आणि अशा अत्यंत कठीण व अंतिम परीक्षेत अर्जुन पूर्ण गुण मिळवून उत्तीर्ण झाला.. आदर्श शिष्य अर्जुन… असा अर्जुन आपण होणे अपेक्षित आहे.
तरच गीतेच्या पठणातून, अभ्यासातून कृतार्थता मिळेल.
“।। वाचे-अर्थे-पाठे फळे।।”… वाचनाने, पठणाने, अर्थ समजून घेतल्याने गीता पाठकाला फळ मिळेलच. पण जगद्गुरू भगवान श्रीकृष्णांना केवळ पठण, वाचन हे अपेक्षित असेल का? माऊली म्हणतात “।। तैसे अध्यात्म शास्त्री इये । अंतरंगची अधिकारिये । येरु लोकु वाकचातुर्ये । होईल सुखिया ।।”
सर्व तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर यथेच्छसी तथा कुरु…आता तुझ्या इच्छेप्रमाणे कर.. असे भगवंतांनी सांगितले तेव्हा ज्ञान प्राप्त झालेल्या अर्जुनाने करिष्ये वचनं तव..असाच निर्णय दिला. आपलीही तयारी करिष्ये वचनं तव असं म्हणण्याची व त्याप्रमाणे जगण्याची असायला हवी…
या सर्वांचा विचार करून श्रीगीता जयंतीच्या पावन दिनी संकल्पित होऊया…