एक वाटी साखर हवी !!
‘एक वाटी साखर’
तुम्ही आजच्या काळात शेजारी ‘एक वाटी साखर’ (cup of sugar) मागायला गेलात का कधी,.. म्हणजे असं बघा कि… घरात पाहुणे आलेत आणि अचानकच लक्ष्यात येत कि साखर संपली आहे. आणि मुलाला सांगितलं ‘जा, शेजारच्या काकुंकडून एक वाटी साखर (cup of sugar) घेऊन ये.’ नाही ना….असं मागणं लाज आणणार वाटत ना.
पण आमच्या लहानपणी आम्ही बिनधास्त काही संपलं कि, शेजारच्या काकूंच्या स्वयंपाकघरात जाऊन हक्काने मागून आणायचो.
वाडा संस्कृती
ज्यांचं -ज्यांचं बालपण वाडा संस्कृतीमध्ये गेलाय त्यांनी हे महान काम एकदाना एकदा तरी पार पाडला असणार याची खात्री आहे.
तर… हि एक वाटी साखर (cup of sugar) कसा गोडवा निर्माण करायची हे बघू.
वाडा किंवा जुनी चाळ, बिल्डिंग मध्ये (मुद्दाम अपार्टमेंट म्हंटल नाही कारण ते जरा हायफाय वगैरे हे सगळं तिथं चालत ना) तिथे हि “एक वाटी” सगळीकडे फिरते.
आई
मला तर तो अजून हि वाडा आठवतो. घरात स्वयंपाकाला आई उभारली आणि काही तरी संपल कि, आई हाक मारून वाटी हातात देऊन पाठवायची .”परत आणलं कि देऊ”, असं आश्वासन हि देऊन यायचो.
अडचणीच्या वेळेस ती एक वाटी साखर (cup of sugar) म्हणा कि अजून कोणता हि पदार्थ असेल कामाला यायचा व वेळ निभावून जायचा. ती एक वाटीभर साखर (cup of sugar) आणताना आमच्या घरी कोण आलाय? हे शेजारच्या काकूंना कळायचं व आम्हांला ‘काकू काय करताय’, हे कळायचं.
हेही वाचा – स्वतः साठी एवढं तरी करा
‘घरी मावशी आलीय का’? मी येते हं संध्याकाळी भेटायला’, हा निरोप वाटी बरोबर आई कडे यायचाच. हमखास मावशी च्या आवडीचा एकतरी पदार्थ घेऊन भेटायला येणारच. त्या बरोबर सकाळच्या इडली चा हि बेत ठरून जायचा .
साखर आणायला गेल्यावर शेजारचे ‘झंडू बाम’ लावून झोपले असले की आई लगेच आल्याचा चहा, संध्याकाळी गरम भाकरी, खिचडी घेऊन रात्री झोपायला सोबत म्हणून जाणारच.
लेक
वाड्यात जर नवीन पोटुशी कोणी लेक आली असेल तर विचारूच नका, कुणाची लोणच्याची वाटी, तर कुणाची भाजी ची वाटी, खिरीची वाटी आवर्जून घरी भेटायला येणारच.
“रिकामं भांड परत देऊ नये” म्हणून मग परत जो काही खास पदार्थ असेल तो भरून दिला जायचा.
कुणाच्या घरात कार्यक्रम असला तर शेजारचे कमी पण त्यांची भांडी जास्त असायची घरात.
कार्यक्रमात एखाद भांड म्हणजे कुणाकडे मोठी कढई असेल, बुंदी पाडायचा मोठा झारा असेल तर माळ्यावरून काढून वापरायला दिला जायचा.
हि छोटी वाटी एकमेकांच्या घरात माणसांना भेटायला मदत करायची. त्या निमित्ताने कुणाला काय अडचण आहे, कशाची गरज आहे हे कळायचं. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता यायच. खऱ्या अर्थाने शेजारधर्म पाळला जायचा.
काकू
आई जर माहेरी गेली तर “आज अळू च्या वड्या केल्यात बाळा, तुला आवडतात ना म्हणून मुद्दाम आणल्यात “,हे बोलणं खूप आधारच व मायेचं असायच. आई नसताना हीच भरलेली वाटी घेऊन काकू लक्ष ठेवायला यायच्या.
आताच्या युगात सगळं रेडिमेड मिळत त्यांना घरचा मसाला ताजा कोणी तरी वाटीभर चवी साठी आणून दिला तर गांवढळ वाटेल, उगीच घरात इंटेरर्फेर करतात असे हि वाटेल.
पण सुट्टीच्या दिवशी असाच चांदण्याच्या प्रकाशात मस्त पंगतीचा आनंद घेऊन पहा, गप्पांचा फड, सोबत खिरीची वाटी सगळा स्ट्रेस निघून जाईल. ज्याच्याबरोबर रक्ताच नातं नाही अशी व्यक्ती वाटीभर आपल्यासाठी काही तरी करून आणते हि कल्पनाच मन रिलॅक्स करणारी आहे. वाईट वेळेत याच धावून येतात, आधार देतात.
आजी
वाड्यात आजी लोक भरपूर असायच्या. वेळेला ओरडायची पण मग आई जवळ रडत जायचो पण आई हि असू दे काही होत नाही म्हणायची, असा राग यायचा, पण तेच हात पास झाल्यावर भांडभर लाडू देऊन घरी पाठवायचे.
अशी ही भांडी, म्हंटली तर साधीच ना, पडली कि चेमटली अथवा फुटली पण त्यात हि खूप आठवणी असतात. सासुरवाशीण “माझ्या आई ने दिलंय” या आठवणीनं त्या भांड्यात तिचे रूप पाहत असते.
माहेरी गेल्यावर याच भांड्याकुंड्याना पाहताना खूप आठवणी चित्रपटासारख्या डोळ्यासमोर येतात.
तर अशी ही वाटी. (cup of sugar)
पण सध्या सुपर मार्केट मध्ये वाईन येणार म्हणून वेगवेगळ्या जोक्स मुळे मलिन झाली आहे.
मगर तुम क्या जानो…….
उस टाइम के ……..
एक वाटी कि किंमत…..
वैजयंती जोशी…